जागतिक खाद्य दिवस विशेष : अन्ननासाडीमुळे भारतात भूकबळी समस्या

भारत, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, अन्नसुरक्षा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भूकबळींचा प्रश्न देशात गंभीर झाला आहे.

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या 'ग्लोबल हंगर इंडेक्स' मध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे - भूकबळींच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर आहे. आणि या समस्येचं मूळ अन्नाच्या तुटवड्यात नाही तर नासाडीत आहे.

जगभरातल्या विकसनशील देशांतील भूकबळींच्या समस्येचा आढावा घेऊन 'इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या अहवालानुसार 119 देशांमध्ये भारताचा क्रमांक शंभरावा आहे. भारत या यादीत बांगलादेश आणि नेपाळ या देशांच्याही मागे आहे.

बालकुपोषणामुळे भारताची स्थिती आणखी ढासळली आहे, असंही हा अहवाल सांगतो.

विकसनशील देशातील नागरिकांना किती आणि कसं अन्न खायला मिळतं, याचा आढावा हंगर इंडेक्समध्ये घेण्यात येतो.

भूकबळींची समस्या असताना अन्नाची नासाडी का?

भूकबळीच्या समस्येने भारताला ग्रासलेलं असताना देशभरात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

अन्नाचा अपव्यय हे भारतातल्या भूकबळी समस्येचं मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारतात 40 टक्के अन्न वाया जातं. या खाण्याचं रुपांतर पैशात केलं तर रक्कम 50 हजार कोटी रुपये एवढी भरेल असं आकडेवारी सांगते.

भारत, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, अन्नसुरक्षा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात अन्नधान्याचं उत्पादन मुबलक प्रमाणात होतं पण साठवणुकीसाठी चांगली गोदामं नाहीत.

आकडे बाजूला ठेवले आणि आजूबाजूला पाहिलं तर अन्नाचा अपव्यय होतो, हे आपल्याही लक्षात येईल. लग्नसोहळे, हॉटेल्स, कौटुंबिक तसंच सामाजिक कार्यक्रम आणि घरीही प्रचंड प्रमाणावर अन्न टाकलं जातं.

हे अन्न वाचवून गरजूंना दिलं तर अनेकांची उदरभरणाची सोय मार्गी लागेल.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार भारतात अन्नधान्याचं पुरेसं उत्पादन होतं, मात्र हे गरजूंपर्यंत पोहचतच नाही.

जगातल्या भूकपीडित व्यक्तींपैकी 25 टक्के लोक भारतात आहेत. भारतात 19.5 कोटी नागरिक कुपोषित आहेत. यामध्ये खायला प्यायला न मिळणारे लोक आहेत आणि मिळणाऱ्या खाण्यात नाममात्र पोषणमूल्य असणारे लोकही खूप आहेत.

अन्नाचा अपव्यय कसा टाळावा?

खाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जागरूक होणे अत्यावश्यक आहे. जेवढी गरज असेल तेवढंच घ्या. जेवण उरल्यास, परिसरातल्या गरजूंना द्यावं.

भारत, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, अन्नसुरक्षा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अन्नधान्याची नासाडी हे भूकबळींच्या प्रश्नामागचं मूळ आहे.

लग्न, कौटुंबिक सोहळे, पार्टी अशा कार्यक्रमांमध्ये वाया जाणारं अन्न स्वीकारून ते गरजूंपर्यंत पोहचवणाऱ्या संस्था आहेत. अशीच एक संस्था म्हणजे रॉबिन हुड आर्मी.

दिल्लीतल्या एका बड्या लग्नसोहळ्यात उरलेल्या अन्नातून पाचशे ते अडीच हजार लोकांचं जेवण होऊ शकतं, असं या संस्थेचे संस्थापक संचित जैन यांनी सांगितलं.

व्यवस्था साहाय्यकारी नाही

साहाय्यकारी यंत्रणा कमकुवत असल्यानं अन्नाची नासाडी होते, असं संचित जैन सांगतात.

"शेतातून धान्य मंडईत पोहचतं. मात्र धान्य साठवण्यासाठी चांगली गोदामं नाहीत आणि त्यामुळे आवश्यकता असताना धान्याचा पुरवठा होत नाही. मोलाचं धान्य गोदामात सडून फुकट जातं."

पुरवठा यंत्रणेत त्रुटी असल्याने अनेकदा अन्नधान्याचे दर चढे राहतात.

उरलेलं अन्न जातं कुठे?

हॉटेलांमध्ये उरलेलं अन्न एकत्र करून जवळच्या परिसरात राहणाऱ्या गरजूंना पुरवले जाईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवे.

स्वयंसेवी संस्थांव्यतिरिक्त सरकारनेही याप्रकरणी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे.

काही दिवसांपू्र्वीच केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल अमेरिकेत गेल्या होत्या. त्यावेळी देशातील अन्नाचा अपव्यय रोखणं ही प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

भारत, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, अन्नसुरक्षा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं.

सामान्य माणसाच्या प्रयत्नांतून हे चित्र बदलू शकतं. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या उपक्रमानुसार चेन्नईतल्या ईसा फातिमा जास्मिन यांनी अशीच एक चळवळ सुरू केली.

ईसा यांनी कम्युनिटी फ्रीज नावाची संकल्पना राबवली आहे. या फ्रीजमध्ये परिसरातील हॉटेल्स आणि सामान्य माणसं शिल्लक राहिलेलं अन्न ठेवतात. गरजू गरीब माणसं या फ्रीजच्या माध्यमातून आपली अन्नाची भूक भागवू शकतात.

भारत, संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, अन्नसुरक्षा.

फोटो स्रोत, FACEBOOK/ THE PUBLIC FOUNDATION

फोटो कॅप्शन, चेन्नईत कम्युनिटी फ्रीज संकल्पना राबवण्यात येत आहे.

पण या संकल्पेलाही मर्यादा आहेत.

मात्र शिल्लक राहिलेलं जेवण मोठ्या प्रमाणावर साठवण्याची सुविधा उपलब्ध झाली तर हजारो उपाशी लोकांचं पोट भरू शकतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)