केसरबाईंच्या भैरवीचे सूर पोचले अंतराळात 20 अब्ज किमी दूर

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
व्हीडिओ कॅप्शन, केसरबाईंनी गायलेल्या भैरवीच्या सूरांचा प्रवास...

(आज -16 सप्टेंबर- केसरबाई केरकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)

दर्जेदार संगीताला भाषा, स्थळ, काळ यांचं बंधन नसतं, असं म्हणतात. पण भारतीय अभिजात संगीताचं एक लेणं मात्र खरोखरच विश्वाच्या प्रवासाला निघालं आहे.

'जात कहां हो' ही केसरबाई केरकरांनी गायलेली भैरवी व्हॉयेजर-1 या अंतराळयानासोबत पृथ्वीपासून 20.8 अब्ज किलोमीटरपेक्षाही दूर पोहोचली आहे.

नासाच्या व्हॉयेजर मोहिमेला नुकतीच 40 वर्ष पूर्ण झाली. 1977 साली व्हॉयेजर 1 आणि व्हॉयेजर 2 या अंतराळयानांनी अवकाशात उड्डाण केलं होतं.

सूर्यमालेच्या परीघावरून दिसणाऱ्या पृथ्वीचं व्हॉयेजरनं टिपलेलं छायाचित्र.

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, सूर्यमालेच्या परीघावरून दिसणाऱ्या पृथ्वीचं व्हॉयेजरनं टिपलेलं छायाचित्र.

गुरू, शनी, युरेनस, नेपच्युन आणि त्यापलिकडच्या अवकाशाचा अभ्यास हे व्हॉयेजर मोहिमेचं उद्दीष्ट होतं.

'पृथ्वीची स्पंदनं'

व्हॉयेजर यानांसोबतच नासानं परग्रहवासीयांसाठी संदेश कोरलेली एक खास ग्रामोफोन तबकडी (गोल्डन रेकॉर्ड) पाठवली होती.

खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांच्या समितीनं ही तबकडी तयार केली होती. सेगननं या तबकडीचा उल्लेख 'मर्मर्स ऑफ द अर्थ' अर्थात पृथ्वीची स्पंदनं असा केला आहे.

"अंतराळातल्या प्रगत परग्रहवासींनाच या रेकॉर्डचा अर्थ लावता येईल," असा विश्वास कार्ल सेगनला वाटत होता.

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, "अंतराळातल्या प्रगत परग्रहवासींनाच या रेकॉर्डचा अर्थ लावता येईल," असा विश्वास कार्ल सेगनला वाटत होता.

कला आणि विज्ञानाचा संगम साधणाऱ्या या सोनेरी तबकडीवर पृथ्वीवरचे आवाज, जगभरातील ५५ भाषांमध्ये रेकॉर्ड केलेले खास संदेश, छायाचित्रं आणि निवडक संगीताचा समावेश आहे.

त्यात मोझार्ट, बीथोवन, बाक या दिग्गजांसह केसरबाई केरकर यांनी गायलेल्या 'जात कहाँ हो अकेली गोरी' या एकमेव भारतीय गीताला स्थान मिळालं.

ही भैरवी व्हॉयेजरच्या 'गोल्डन रेकॉर्ड'वर असायलाच हवी, यावर वर्ल्ड म्युझिकचा अभ्यास करणारे संगीतज्ज्ञ रॉबर्ट ई ब्राऊन अगदी ठाम होते, अशी आठवण या प्रकल्पाची कलादिग्दर्शक आणि सेगनची पत्नी अॅन ड्रुयाननं 'मर्मर्स ऑफ द अर्थ' या पुस्तकात नोंदवली आहे.

पाश्चिमात्य अभ्यासकांनाही खिळवून ठेवण्याची ताकद केसरबाईंच्या आवाजात होती. त्यांच्या या प्रभावी गायकीला गोव्याचा वारसा लाभलाय.

भारतीय संगीताची 'सूरश्री'

13 जुलै 1893 रोजी गोव्यात केरी गावात, संगीताची साधना करणाऱ्या घरातच केसरबाई केरकरांचा जन्म झाला. त्यांनी सुरुवातीला प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताची साधना केली.

"त्या काळी गायक, संगीतकारांना संस्थानिकांच्या दरबारी किंवा मुंबईत श्रीमंतांच्या घरी आश्रय मिळत असे. केसरबाईही मग पुढे मुंबईलाच स्थायिक झाल्या", असं गोव्याचे संगीत-संस्कृती अभ्यासक डॉ. पांडुरंग फळदेसाई सांगतात.

मुंबईत केसरबाईंनी वेगवेगळ्या गुरूंकडे गायनाची दीक्षा घेतली. पण त्यांच्या गाण्याला खरी धार चढली ती जयपूर अत्रौली घराण्याच्या उस्ताद अल्लादियाँ खानसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली.

दोन तपांच्या संगीत साधनेनंतर केसरबाई जाहीर मैफिलीत गाऊ लागल्या.

फोटो स्रोत, सूरश्री केसरबाई केरकर हायस्कूल, केरी

फोटो कॅप्शन, दोन तपांच्या संगीत साधनेनंतर केसरबाई जाहीर मैफिलीत गाऊ लागल्या.

हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर यांच्यासोबत केसरबाईंनीही शास्त्रीय गायकीतली पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली. रवींद्रनाथ टागोरही केसरबाईंच्या आवाजाचे चाहते होते.

कोलकात्याच्या संगीतानुरागी सज्जनीनं केसरबाईंचा 'सुरश्री' उपाधीनं गौरव केला. तर भारत सरकारनं केसरबाईंना पुढे 'पद्मभूषण'ने सन्मानित केलं. महाराष्ट्र सरकारनं राज्य गायिका म्हणून त्यांचा गौरव केला. पण जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांना आदरानं माई म्हणूनच ओळखलं जायचं.

साठच्या दशकात केसरबाईंनी हळूहळू जाहीर कार्यक्रमांत गाणं बंद केलं. त्यांनी फारशी गाणी रेकॉर्ड केली नाहीत, फोटो काढणंही त्यांना पसंत नव्हतं, पण शिल्पकार शर्वरी राय चौधरी यांना पु.लं.च्या मध्यस्थीमुळे केसरबाईंचा एक पुतळा तयार करण्याची संधी मिळाली.

तू माझ्याशी गप्पा मारणार असशील आणि तुझी गाणी ऐकवणार असशील तरच मी पुतळ्यासाठी एवढा वेळ बसून राहीन अशी अट केसरबाईंनी पुलंना घातली होती. "आमच्या नशिबातले ते भाग्यशाली दिवस" अशा शब्दांत पुलंनी त्या दिवसांचं वर्णन केलं आहे.

गोव्यात केसरबाईंच्या पाऊलखुणा

5 सप्टेंबर 1977 रोजी व्हॉयेजर-1 अंतराळ यानानं अवकाशात उड्डाण केलं. बरोबर 40 वर्षांनी, 5 सप्टेंबर 2017 रोजी, केसरबाईंच्या पाऊलखुणा शोधत आम्ही गोव्यात पोहोचलो.

केरीच्या वाटेवर काही वेळा मोबाईल फोनचं नेटवर्क बंद होतं. त्याच वेळी 40 वर्षांपूर्वी सोडण्यात आलेली व्हॉयेजर यानं आजही पृथ्वीच्या संपर्कात आहेत, ही गोष्ट थक्क करून जाते.

केसरबाईंच्या संगीताची जादूही तशीच कालातीत असल्याचं जाणवतं. आजच्या डिजिटल म्युझिकच्या जमान्यात, ग्रामोफोन तबकडीवर रेकॉर्ड करण्यात आलेली ती भैरवी साद घालत राहते.

केरी गावातली शाळा

'जात कहा हो' हा प्रश्न स्वतःलाच विचारत आम्ही केरी गावात दाखल झालो. केसरबाईंनी त्यांच्या गावी बांधलेल्या घरातच आता त्यांच्याच नावानं शाळा उभारण्यात आली आहे.

केसरबाईंच्या आठवणी केरी गावातील शाळेनं जपून ठेवल्या आहेत.

फोटो स्रोत, सूरश्री केसरबाई केरकर हायस्कूल, केरी

फोटो कॅप्शन, केसरबाईंच्या आठवणी केरी गावातील शाळेनं जपून ठेवल्या आहेत.

सूरश्री केसरबाई केरकर हायस्कूलचे संगीत शिक्षक श्रीकृष्ण वझे सांगतात, "गुरुकुल पद्धतीनं गोव्यातील मुलांना शिक्षण द्यावं, या उद्देशानं केसरबाईंनी हे घर बांधलं होतं. पण काही कारणांनी ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही."

"आता या शाळेत संगीत शिकवलं जातं आणि त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छाही पूर्ण झाली आहे," असं वझे सांगतात.

काळ सरतो आहे, तशा केसरबाईंच्या पाऊलखुणा पुसट होत चालल्या आहेत. पण केसरबाईंनी गायलेली भैरवी अंतराळात प्रवास करते आहे.

केसरबाईंच्या गाण्याविषयी पु.लं. लिहितात, "तीन साडेतीन मिनिटांच्या तबकडीतून केसरबाईंच्या गाण्याचा अंदाज करणे हे जवळजवळ चित्रातले फूल पाहून त्याच्या सुगंधाचा अंदाज करण्यासारखे आहे."

पण कधी व्हॉयेजर यान परग्रहवासीयांच्या संपर्कात आलंच, तर त्यांना भारतीय संगीताची ओळख करून द्यायला ही तीन मिनिटांची भैरवी पुरेशी ठरावी.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)