ताजमहाल 'परदेशी' मुघलांचा, मग मौर्य स्वदेशी कसे?

  • रजनीश कुमार आणि वात्सल्य राय
  • बीबीसी प्रतिनिधी
मुघल, इतिहास, संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुघल प्रशासक

आग्रास्थित ताजमहाल सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक आहे. मात्र सध्या ही वास्तू भारतीय राजकारणांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

केंद्रात नरेंद्र मोदींचं भाजप सरकार आल्यानंतर इतिहासातल्या "त्रुटी" दाखवून इतिहासच बदलण्याचा कल वाढला आहे.

उत्तर प्रदेशातल्या भाजप सरकारने राज्याच्या पर्यटन विभागाच्या माहिती पुस्तिकेतून ताजमहालला वगळलं. दुसरीकडे, भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल आपल्या संस्कृतीवर कलंक असून त्याची निर्मिती करणारे फितूर होते, असं म्हटलं आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ताजमहालवर तोंडसुख घेतलं होतं. "ताजमहाल भारतीय संस्कृतीचं प्रतीक नाही," असं त्यांनी म्हटलं होतं.

मुघल बादशहा अकबराला हल्लेखोर म्हणूनही योगी यांनी टीका केली होती.

दुसरीकडे, राजस्थानमध्ये मुलांना असंही शिकवलं जाऊ शकतं की हळदीघाटच्या लढाईत राजपूत प्रशासक महाराणा प्रतापने मुघल बादशाह अकबरला नमवलं होतं.

आजचं कार्टून

फोटो स्रोत, Kirtish Bhatt

फोटो कॅप्शन, शुद्ध, सात्विक, देशी प्रेक्षणीय स्थळ?

उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या मते केवळ ब्रिटीश राजच नव्हे तर मध्ययुगीन काळातही भारत गुलामगिरीत होता.

तर मग काय इंग्रजांच्या 200वर्षं आधीपासून भारत गुलाम होता? मुघल प्रशासक परदेशी होते का? हे सारे प्रश्न आम्ही प्राध्यापक इरफान हबीब, प्राध्यापक रामनाथ आणि हरबंस मुखिया यांच्यासमोर मांडले.

इरफान हबीब

इतिहास पुसून टाकता येत नाही. आपल्या इतिहासाचे घटक कायम राहतात. त्यात बदल करता येत नाही. टीका करणाऱ्यांनी ताजमहाल पाडून टाकला तरी तो इतिहासाचा भाग राहील.

वाचाळवीरांना कोणीही रोखू शकत नाही. मनातली गरळ ते ओकतात. ते मुसलमानांना परदेशी ठरवतात.

आपला देश सोडून कायमस्वरुपी दुसऱ्या देशात जाणाऱ्या तसंच देशाची संपत्ती बाहेर नेणाऱ्या माणसांना जगभरात परदेशी म्हटलं जातं.

इंग्रज आपल्या वसाहती देशांची अशी लूट करायचे. मुघल आणि इंग्रजांच्या प्रशासनात फरक करायला हवा.

टीकाकार मंडळी ज्यांना विदेशी ठरवतात त्यांचा जन्म इथलाच आहे. त्यांनी देहही इथंच ठेवला.

मुघल, इतिहास, संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुघल प्रशासक

जर मुघल हल्लेखोर होते, तर मग मौर्यांचं गुजरातमध्ये शासन होतं. मग ते हल्लेखोर का नाहीत?

मौर्य मगध प्रांतातले होते. मग त्यांचं राज्य गुजरातमध्ये कसं? हे प्रमाण मानलं तर शासन उच्चवर्णियांचं होतं तर प्रजा उच्चवर्णीय गुलाम होती, असं म्हणावं लागेल.

गुजरात आणि मगध यांचा स्वतंत्र प्रदेश म्हणून विचार केला तर मौर्य विदेशी ठरतात. त्यावेळी संपूर्ण देशात मुघलांची सत्ता होती, असंही म्हणणं वावगं ठरणार नाही.

यावरून हे लक्षात येतं की आजचे सत्ताधारी आणि टीकाकार मुस्लिम आणि दलित विरोधी धोरण आगामी निवडणुका लक्षात घेऊन राबवत आहेत.

हरबंस मुखिया

ज्याला आपण आक्रमण म्हणतो तो प्रत्यक्षात पळून जाण्याचा प्रकार आहे. आक्रमणाचा इतिहास 50-60 वर्षांपूर्वीच नाकारण्यात आला.

बाबर आणि हुमायू मध्य आशियातून भारतात आले होते. अकबरचा जन्म उमरकोटच्या एका राजपूत घरात झाला होता.

अकबर भारताबाहेर कधीच गेले नाहीत. अकबर यांच्यानंतरच्या सर्व मुघल प्रशासकांचा जन्म भारतातच झाला होता. यापैकी कोणी भारताबाहेर गेलं नाही.

त्यावेळी देश आणि परदेश अशा संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या.

मुघल, इतिहास, संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुघल राजाचे चित्र

मुघल राजांचे वंशज कुठले होते? ते इथलेच आहेत किंवा इथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

याआधी खिलजी आणि तुघलक वंशाचे राजे राज्य करत होते. या सगळ्यांचे वंशज कुठे आहेत? ते इथे आले. लढाया केल्या आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

इंग्रज परदेशी होते. ते इथे आले आणि तब्बल 200 वर्षं लूटमार करून निघून गेले. हे खरे परदेशी.

जी माणसं इथं आली आणि या प्रदेशाच्या संस्कृतीला त्यांनी आपलंसं केलं, त्यांना परदेशी कसं म्हणणार?

कोणत्या आधारावर त्यांची गणना परदेशी म्हणून करणार? ते केवळ बाहेरून आले होते म्हणून.

देशी आणि परदेशी निकष बाजूला ठेऊन विचार केला तर इंग्लंडच्या राणीलाही देश सोडावा लागेल. म्हणूनच परदेशी राज म्हटल्यावर आपण इंग्रजांच्या राजवटीला म्हणतो, कारण ते इथे आले आणि लूटमार करून गेले.

इंग्रज दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथंच स्थायिक झाले. ते भारतातही थांबले असते तर परदेशी म्हणून त्यांची हेटाळणी झाली नसती.

भारत तब्बल 200 वर्षं गुलामगिरीत खितपत पडला होता. इंग्रजांनी आपलं शोषण केलं आणि ते निघून गेले. इंग्रज आणि आपलं नातं शोषणकर्ते आणि शोषक असंच आहे.

मुघल, इतिहास, संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, परदेशी पर्यटक ताजमहालच्या प्रांगणात.

ते मुघलांसारखे इथे स्थायिक झाले असते तर त्यांना कोणीही विदेशी म्हटलं नसतं.

टॉम अल्टर यांना कोणी विदेशी म्हणतं का? जगात असा कोणताही देश नाही जिथे बाहेरची माणसं आलेली नाहीत.

मुघलांच्या काळात संस्कृतीला महत्त्व होतं. आज ज्या हिंदी भाषेचा वापर केला जातो ती मुघलांच्या काळातलीच आहे. भाषा आणि खाणंपिणं मुघल राजवटीची देणगी आहे.

इतिहासाचे संदर्भ बदलत आहेत. आता लोकांना पुन्हा इतिहासाची रचना हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी करायची आहे. सध्याच्या रचनेत त्याचं काहीच महत्त्व नाही. पण त्यांना जुने दिवस उकरून काढायचे आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, मध्य प्रदेशात मुरैना जिल्ह्यातील बटेश्वर इथं 8व्या शतकातील 200 मंदिरांचे भग्नावशेष सापडले.

देश आणि परदेश या परस्परविरोधी कल्पना 18व्या आणि 19व्या शतकातील आहेत. 16व्या शतकात देश, परदेश आणि परदेशी अशा संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या.

त्यामुळे राष्ट्र अर्थात देश अशा स्वरुपाचं काहीच नव्हतं. या सगळ्या गोष्टी नंतरच आल्या, त्यामुळे त्यांचा संदर्भही नवीन आहेत.

प्रोफेसर रामनाथ

सत्ताधारी मंडळी अकबर आणि शहाजहान यांना लुटारू म्हणत आहेत. पण त्यांना स्वत:बद्दल पुरेशी माहिती नाही.

अकबरने आयुष्यात हिंदी चालीरीती अंगीकारल्या. अकबराने मुघल साम्राज्याला राष्ट्र अर्थात देशाचे स्वरूप दिलं.

तालिबानने अफगाणिस्तानात जो हैदोस घातला, तसं काहीही अकबरच्या डोक्यात नव्हतं. अफगाणिस्तानात बुद्धाच्या प्राचीन मुर्तींची विटंबना करण्यात आली. मुघल राजांनी असं काही केलं का?

मुघल, इतिहास, संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहालयात मुघल राजाचे चित्र पाहताना प्रेक्षक.

आपल्या इतिहास आणि संस्कृतीचा मुघल अविभाज्य घटक आहेत. अमीर खुसरोंचं योगदान आपण नाकारू शकतो का?

सत्ताधारी टीकाकारांनी समजूतदारपणा दाखवला तर याविषयावर चर्चा होऊ शकते. अन्यथा त्यांनी त्यांची भूमिका मला पटवून द्यावी किंवा माझी मतं तरी त्यांनी समजून घ्यावी.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)