'रस्त्यात मरून पडलेलं कुत्रं पाहून मी नशा करणं सोडलं!'

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी प्रतिनिधी, नागपूरहून
तुषार नातू

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

फोटो कॅप्शन, तुषार नातू

"मला हेही कळत नव्हतं आपण ब्राऊन शुगर पितोय, आपला दीड वर्षाचा मुलगा खेळतोय इथे. मुलाला घेऊन मी चार ठिकाणी भीक मागितल्यासारखेच पैसे मागितले खोटं बोलून."

तुषार नातू अगदी शांतपणे नशेच्या गर्तेत हरवलेल्या दिवसांविषयी सांगतात.

जेमतेम 18 वर्षांच्या वयात तुषार यांना अमली पदार्थांची चटक लागली होती. गांजा, चरस, भांग, अफू, गर्द अर्थात ब्राऊन शुगर. तुषार यांना अशी व्यसनं जडत गेली होती.

"शेवटी आईनं आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेरचा जालीम उपाय म्हणून मला जेलमध्येही टाकण्यात आलं. पत्नीकरवीच तक्रार दिली होती," ते सांगतात.

तुषार यापूर्वी मेंटल हॉस्पिटल आणि पुनर्वसन केंद्रात वारंवार दाखल झाले. पण प्रत्येक वेळी बाहेर आल्यावर ते पुन्हा नशेच्या जाळ्यात अडकत गेले.

"माझ्या हट्टी आणि जिद्दी स्वभावामुळे आणि चंचल मनोवृत्तीमुळे मी टिकू शकलो नाही आणि पुन्हा पुन्हा व्यसन करत गेलो," ते सांगतात.

नागपूरच्या एका व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही तुषार यांची भेट घेतली. निमित्त ठरली एक युवा समाजसेविका.

नागपूरमध्ये 'BBC She' उपक्रमाअंतर्गत झालेल्या चर्चेदरम्यान तिनं अमली पदार्थांच्या व्यसनाविषयी चिंता व्यक्त केली आणि या विषयावर अधिक वार्तांकन होण्याची गरज बोलून दाखवली.

त्यानंतर जे चित्र समोर आलं, ते धक्कादायक होतं.

'उडता' महाराष्ट्र?

भारतात नशेची समस्या म्हटलं की वारंवार पंजाबचं नाव पुढे केलं जातं. इतकं की बॉलिवूडनेही त्याची दखल घेतली आणि पंजाबचा 'उडता पंजाब' झाला. पण महाराष्ट्रातली आकडेवारीही धक्कादायक आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) 2014 सालच्या माहितीनुसार देशभरात सुमारे 3,647 जणांनी अमली पदार्थांच्या नशेपाई आत्महत्या केली होती. त्यातल्या 1,372 आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात होत्या. हे प्रमाण 37 टक्के होतं, म्हणजेच दर तिसरी आत्महत्या महाराष्ट्रात झाली होती.

या यादीत तामिळनाडू (552 आत्महत्या) दुसऱ्या तर केरळ (475 आत्महत्या) तिसऱ्या स्थानावर आहे. तर याच काळात पंजाबमध्ये नशेच्या अमलाखाली 38 आत्महत्यांची नोंद झाली.

ड्रग अडिक्ट व्यक्ती

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

देशात वेगवेगळ्या पदार्थांचं नशेसाठी सेवन होत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशकांच्या निदर्शनास आलं आहे. त्यात गांजा, चरस, भांग, अफू, ब्राऊन शुगर, कोकेनसारखे अमली पदार्थ तर आहेतच, पण सहज उपलब्ध होणारी टर्पेंटाईन, व्हाईटनरसारखी रसायनं आणि अगदी नेल पॉलिश आणि पेट्रोलचाही समावेश आहे.

दारू पिणाऱ्याच्या तोंडाला येतो तसा वास या पदार्थांचं सेवन केल्यावर येत नाही. त्यामुळं त्यांचं व्यसन एखाद्याला जडलं असेल तर ते कुटुंबीयांनाही लक्षात येत नाही.

महिलांमधल्या व्यसनाधीनतेकडे दुर्लक्ष?

महिलांमधल्या व्यसनाधीनतेचं प्रमाण समजणं आणखी कठीण आहे, कारण अनेक महिला समोरही येत नाहीत. 'मुक्तांगण' या महाराष्ट्रातल्या मोठया व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी या समस्येच्या मुळाकडे लक्ष वेधलं.

"स्त्रियांच्या व्यसनाधीनतेकडे कलंक म्हणून पाहिलं जातं. घरचे ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करतात आणि तिला डॉक्टरकडेही नेलं जात नाही," असं त्या सांगतात.

तर नागपूरच्या चिकित्सा मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉ. स्वाती धर्माधिकारी सांगतात, "महिलांना योग्य उपचार मिळत नाहीत जसे पुरुषांना मिळतात. केवळ मुलींसाठी असलेली व्यसनमुक्ती केंद्रं कमी आहेत, त्यामुळं त्यांचं शोषण सहज शक्य होतं."

डॉ. स्वाती धर्माधिकारी

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

फोटो कॅप्शन, डॉ. स्वाती धर्माधिकारी

खरं तर देशात सर्वाधिक सरकारमान्य व्यसनमुक्ती केंद्रं (Integrated Rehabilitation Centre for Addicts अर्थात IRCA) ही महाराष्ट्रात आहेत. देशभरात अशा एकूण 435 केंद्रांपैकी 69 केंद्रं महाराष्ट्रात आहेत आणि त्यातील 27 केंद्रं विदर्भाच्या दहा जिल्ह्यांत (गडचिरोली वगळता) आहेत.

त्याशिवाय महाराष्ट्रात अनेक खासगी संस्थाही व्यसनमुक्तीसाठी काम करतात. पण राज्यात अधिकृत IRCA पैकी केवळ दोन निवासी केंद्रं महिलांना उपचार पुरवू शकतात.

"एखाद्या व्यसनाधीन स्त्रीची माहिती मिळाली तरी तिला घेऊन कुठे जाणार?" असं 'मुक्तांगण' ट्रेनिंग सेंटरचे प्रादेशिक समन्वयक संजय भगत विचारतात.

केवळ महिलांसाठी असं केंद्र उभारणंही सोपं नाही, कारण त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित महिलांचीही उणीव भासत आहे. 'मुक्तांगण'ने यावर उपाय शोधला आहे.

पुनर्वसन केंद्र

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

2009 सालापासून त्यांनी 'निशिगंध' या केवळ महिलांसाठीच्या 15 बेडच्या केंद्राची स्थापना केली.

मुक्ता पुणतांबेकर सांगतात, "आमच्या इथे सर्व कर्मचारी महिलाच आहेत. त्यामुळं इथं दाखल झालेल्या महिला रुग्णांना अगदी परकं वाटत नाही."

"ज्यांचे वडील, पती किंवा मुलं व्यसनाधीन आहेत अशा महिलांना आधार देण्याचं काम आमचा 'सहचरी' गट करतो. त्यातल्याच काही महिलांना आम्ही प्रशिक्षण दिलं आणि आता त्याच महिला 'निशिगंध'चं काम डॉक्टर आणि समुपदेशकांसोबत करतात."

या समावेशक योजनेमुळं व्यसनातून मुक्त झालेल्या महिलांनाही नवी संधी मिळत आहे. पण खरी समस्या आहे ती माहितीचा अभाव.

अमली पदार्थांच्या व्यसनामुळे भारतात किती महिला प्रभावित झाल्या आहेत, याविषयी सर्वसामावेशक माहिती उपलब्ध नाही.

'हे फक्त हिमनगाचं टोक'

भारतात 2001नंतर नशेच्या समस्येविषयी कोणतंही सर्वसामावेशक सर्वेक्षण झालेलं नाही. 2016 साली केंद्र सरकारने व्यसनाधीनतेचं प्रमाण, स्वरूप, प्रकार आणि व्यसनाधीन व्यक्तींची संख्या यांविषयी माहिती जमा करण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षण सुरू केलं.

त्याअंतर्गत देशातल्या 29 राज्यं आणि सात केंद्रशासित प्रदेशांतून माहिती जमा केली जात असून, त्यात पुरुषांसोबतच महिला आणि ट्रान्सजेन्डर व्यक्तींचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. यंदा ऑक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण होऊन अंतिम अहवाल प्रकाशित होणं अपेक्षित आहे.

व्यसनाधीनता

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

पण समोर येत असलेली माहिती जाणकारांनाही विचार करायला लावणारी आहे, असं मत 'मुक्तांगण'च्या संजय भगत यांनी मांडलं आहे. संजय हे या सर्वेक्षणासाठी माहिती गोळा करणाऱ्या प्रादेशिक टीमचं नेतृत्व करत आहेत.

"आतापर्यंत आम्ही नोंदवलेली निरीक्षणं अस्वस्थ करणारी आहेत. हे केवळ हिमनगाचं टोक पाहण्यासारखं हे. व्यसनाधीन व्यक्तींचं प्रमाण वाढत आहे आणि कमी वयातच मुलं व्यसनाकडे वळत आहेत," असं ते सांगतात.

भारतात आणि महाराष्ट्रातली परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे अंतिम अहवाल प्रकाशित झाल्यावरच कळेल. पण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहायला हवं, असंच जाणकारांना वाटतं.

"व्यसनाधीनतेच्या समस्येविषयी जागरुकता निर्माण करणं आणि लोकांना त्याच्या परिणामांची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे," असं मुक्ता यांना वाटतं.

आयुष्याची नवी पहाट

नागपूरच्या हिंगण्यातल्या औद्योगिक परिसरातील एका काहीशा सुनसान रस्त्यावर कोपऱ्यात 'मैत्री' हे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र म्हणजे एक वेगळं जगच आहे.

इथे बाहेरच्या अंगणात कबुतरं, कोंबडे, बदकं असे पाळीव पक्षी रणरणत्या उन्हात दाणे टिपतायत. आतल्या डॉर्मिटरी हॉलमध्ये व्यसनमुक्तीसाठी आलेले 115 रुग्ण (ज्यांना इथे 'मित्र' म्हटलं जातं) योगाचा सराव करत आहेत. इथेच तुषार नातू समुपदेशक म्हणून काम करतात.

तुषार नातू

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

"मी रस्त्यात मरून पडलेलं एक कुत्रं पाहिलं बेवारशी. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला की 'अरे! आपली पण अशीच अवस्था होणार आहे एक दिवस'. तेव्हापासून चौदा वर्षं झाली. आता मी पूर्णतः व्यसनमुक्त आहे."

तुषार यांच्या कौटुंबिक आयुष्यातही स्थैर्य आलं असून त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहेत. आपले अनुभव त्यांनी 'नशायात्रा' या पुस्तकातून मांडले आहेत.

तुषार आता 'मैत्री' केंद्राचे संस्थापक रवी पाध्ये यांच्यासोबत इतर व्यसनाधीन व्यक्तींना पुनर्वसनासाठी मदत करतात. रवी यांनी लोक नशेकडे का वळतात, याकडे आमचं लक्ष वेधलं.

रवी पाध्ये

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

फोटो कॅप्शन, रवी पाध्ये
Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

"विस्कळीत कुटुंबं, कामाचा तणाव, चुकीची संगत, अशी अनेक कारणं आहेत. आपल्या आनंद साजरा करण्याच्या पद्धती बदलत आहेत. लोक सहज दारू-सिगारेटनं सुरुवात करतात आणि मग त्यांना व्यसन जडत जातं," असं रवी यांचं निरीक्षण आहे.

गेल्या दशकभरात मुंबई-पुण्याजवळच्या छोट्या शहरांत, रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्ट्यांवरील धाडींमुळे तरुणाईमधली व्यसनाधीनता चर्चेत आली.

'मैत्री'मध्येच आम्हाला यश (नाव बदललं आहे) भेटला. गेली १२-१३ वर्षं, म्हणजे शाळेत असल्यापासूनच तो अमली पदार्थांचं सेवन करायचा. आता वयाच्या 28व्या वर्षी आपण आपलं आयुष्य कसं उधळून लावलंय, याची त्याला जाणीव होते आणि खंतही.

"स्वतःच्या शरीराचं मी नुकसान करून घेतलं. मी डान्स करायचो, राष्ट्रीय पातळीवर कराटे खेळलोय. आता त्यातलं काही करू शकत नाही."

यश मोठ्या धीरानं पण अगदी कमी आवाजात आम्हाला त्याची कहाणी सांगतो. त्यानं सोसलेल्या वेदनांचं आणि पश्चात्तापाचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात दिसतं.

"इथे येऊन बराच फरक पडला आहे. सर नेहमी म्हणतात संयम ठेवा, तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही पुन्हा नशेकडे वळणार नाही. मी खूप प्रयत्न करतो. सहन करण्याची ताकद आली आहे आता."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)