मोदींचं मौनव्रत: देशाच्या पंतप्रधानांना लोकांशी एकतर्फी बोलायलाच का आवडतं?

  • सुहास पळशीकर
  • ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
अमित शहा आणि मोदी

फोटो स्रोत, Getty Images

मोदी आणि राहुल गांधी असा सामना गेली पाच वर्षं चालू आहे. अर्थात तो मुद्दाम सुरू केला गेला तो मोदींच्या प्रचार यंत्रणेकडून. २०१४ च्या प्रचारात राहुल गांधी हे मोदींचे आवडते लक्ष्य होते. नवख्या राहुल गांधींना तेव्हा कॉंग्रेस पक्षाच्या प्रसिद्धी यंत्रणेची फारशी मदत होत नव्हती, आणि त्यांची हास्यास्पद प्रतिमा बनवून आपल्या स्व-प्रतिमेचे संवर्धन करणे मोदींना सोपे जात होते.

निवडणुकीनंतर मोदींनी आणि त्यांच्या राजापेक्षा जास्त राजनिष्ठ अशा ट्विटर-भक्तांनी तोच परिपाठ पुढे चालू ठेवला. त्यातून अनायासे राहुल गांधी प्रकाशझोतात राहिले. पाहता-पाहता त्यांनी काही राजकीय कौशल्ये आत्मसात करायला सुरुवात केली आणि त्याचा प्रत्यय २०१९च्या प्रचार मोहिमेत आला.

निवडणुकीचे निकाल काही लागोत, आता नुकतीच संपलेली निवडणूक लक्षात राहील ती लोकप्रिय मोदींच्या मर्यादा पुढे आणणारी निवडणूक म्हणून. विशेषतः अननुभवी राहुल गांधी यांनी जनसंपर्कात घेतलेल्या आघाडीमुळे मोदींची ही मर्यादा जास्त डोळ्यात खुपणारी ठरली.

एका वाक्यात सांगायचं तर मोदी हे संपर्काचा एकतर्फी (वन-वे) रस्ता आहेत हे या निवडणुकीतून दिसून आलं. लोकशाहीत नेता हा वक्ता असायला लागतो, तसाच तो संवादक असायला लागतो. ती गोष्ट मोदींमध्ये नाही ही बाब गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार अधोरेखित झाली.

त्याची परमावधी झाली ती परवाच्या शुक्रवारी म्हणजे शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपताना झालेल्या पत्रकार परिषदेत.

फर्डा वक्ता मौनात का गेला?

या परिषदेत मोदींनी भाषणवजा निवेदन केलं आणि चक्क पुढे एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. फर्डा वक्ता असणारा आपला पंतप्रधान पाच दहा पत्रकारांच्या पुढे अचानक मौनात गेलेला पाहून त्यांच्या वाक्चातुर्यावर भुललेल्या कित्येकांना धक्का बसला असेल.

असं का झालं असेल? सामाजिक माध्यमांवर याची जी चर्चा झाली, त्यात एक उत्तर असं दिलं गेलं की मोदींच्या या कृतीतून त्यांचं औद्धत्य दिसलं, तर कोणी म्हणालं की पत्रकारांबद्दल असणारी तुच्छता त्यातून व्यक्त झाली. या दोन्ही गोष्टी कदाचित असतीलही. काहींच्या मते मोदींचं यापूर्वीचं राजकारण त्यांना उत्तरं द्यायला अडचणीचं ठरू शकतं. तेही असेल. पण मोदींच्या मौनाचं कोडं सोडवायचं झालं तर आणखी काही तपशील लक्षात घ्यायला लागतील.

उदाहरणार्थ, या निवडणूक मोसमात चर्चा झाली तो विषय म्हणजे मोदींची अक्षयकुमार यांनी घेतलेली बिगर-राजकीय मुलाखत. तुम्ही ती सगळी पाहू शकलात का? संथ गतीने झालेली ही मुलाखत कडेलोटाची कंटाळवाणी होते. त्याला अक्षयकुमारचे गोंधळलेपण हे तर कारण आहेच, पण उत्तर देणारी व्यक्ती स्वतःच कमालीची अलिप्त आणि कंटाळलेली दिसते.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

याचं एकच कारण असू शकतं—ते म्हणजे आपली साधी, चारचौघांसारखी प्रतिमा मोदींना चालत नाही. त्यांचा गेली पाच वर्षं आविर्भाव काय राहिला? 'रिश्तेमें हम तुम्हारे..' हा अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवतो? तसे आपण रिश्ते में या देशाचे नवे भाग्यविधाते आहोत असं मोदींच्या मनाने घेतलेलं दिसतं.

सतत आपल्या फुगवलेल्या प्रतिमेच्या प्रेमात राहिल्यामुळे एक सामान्य (म्हणजे चारचौघांसारखे) राजकीय नेते आहोत, हे स्वतःशी देखील त्यांना मान्य करता येत नाही. त्यामुळे संवादाच्या—गप्पांच्या किंवा बरोबरीच्या नात्याने केलेल्या देवाणघेवाणीच्या—शक्यता संपतात.

गर्दी, त्यात मोदी हेच मुख्य वक्ते आणि वातावरण सगळं भारलेलं, असा माहोल असेल तर मोदी फॉर्मात येतात. तिथे त्यांनी सगळी तयारी केलेली असते, पंच-लाइन म्हणजे लोकांना उत्तेजित करून सोडणारा कळीचा डायलॉग आधी ठरलेला असतो. प्रतिपक्षाची व्यक्तिगत खिल्ली उडवण्याच्या युक्त्या आधीच योजलेल्या असतात.

नाही तर मग मन की बात. पुन्हा एकटे मोदी. तिथे टेलिप्रॉम्प्टर असतो. मध्ये अडवणारे कोणी नसते. प्रश्न नाहीत तर उपप्रश्न कुठून येणार? मोदी बोलणार आणि ते रेकॉर्ड केले जाणार—मग ट्वीट केले जाणार, मग अनुयायांच्या कडून गाजवले जाणार. एवढाच मामला असतो.

'आत्या'कडून कोडकौतुक अन् प्रश्नांची धास्ती

म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींनी पत्रकारांशी बोलायला सुरुवात केली; त्या मुलाखातींना प्रतिसाद मिळू लागल्यावर मग मोदींना मुलाखती देणे भागच होते. तशी मागे त्यांनी एक मुलाखत दिली होतीच—थोर कवी-गीतकार प्रसून जोशी यांना. पण ती म्हणजे लहान मुलाला कोडकौतुकाने आत्याने किंवा मावशीने प्रश्न विचारून मुलाची हुशारी सिद्ध करण्यासारखी होती. आधी ठरवून सगळे नाटक रचले गेले असा त्याबद्दल संशय होता.

आता निवडणुकीच्या काळात मुलाखती म्हटल्यावर (निदान काही धाडसी) पत्रकार आडवे-तिडवे प्रश्न विचारणार. म्हणून मग ठराविक पत्रकारांना मुलाखती दिल्या गेल्या—ते त्रास देणार नाहीत यावर भरवसून. तरीही 'इंडियन एक्स्प्रेस'च्या मुलाखतीत मोदी किती असुरक्षित होते ते पाहिले—त्यांची अधांतरी उत्तरे वाचली—म्हणजे त्यांना प्रश्नपत्रिकेची भीती वाटत असणार हा अंदाज पक्का होतो.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, PMO

त्यातूनच मग त्यांच्या एका मुलाखतीचं स्क्रिप्ट कोणीतरी कॅमेर्‍यात टिपलं आणि ते मग काही काळ सोशल मीडियावर फिरलं.

एकंदर काय, तर अचानक विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची त्यांना धास्ती दिसते. त्याचं एक कारण म्हणजे अडचणीचे प्रश्न आले तर न चिडता ते कसे हाताळायचे, असा प्रश्न असणार. नोटबंदीमुळे झालेला त्रास असो की रोजगार कमी झाल्याची तक्रार असो, त्याची आयत्या वेळी उत्तरे देणे अवघड.

भरीला दुसरं कारण म्हणजे मोदी चिडले, किंवा त्यांची तारांबळ उडाली तर त्यांची जी प्रतिमा गेली पाच वर्षं घडवली गेली आहे तिला तडे जाणार. मागे करण थापर यांची मुलाखत अर्धवट सोडून गेल्याचा इतिहास त्यांना आठवत असणार.

म्हणून मग सुरक्षकवच म्हणून आयत्या वेळचे प्रश्न मोदींच्या एकूण राजकीय संपर्काच्या व्यूहरचनेतून बाद होतात.

झाडाझडतीमुळे राजकीय समानता

नेत्याचा कस पाहणे हे लोकशाहीचे एक वैशिष्ट्य असते. संसदीय पद्धतीत सभासद प्रश्न विचारतात आणि मंत्री-पंतप्रधान यांनी उत्तरे द्यायची असतात, चर्चा होतात, त्यांना प्रतिसाद द्यायचा असतो. पण अगदी अध्यक्षीय पद्धत म्हटली तरी वारंवार माध्यमे नेत्यांना हवे तसे प्रश्न विचारतात.

अनेकवेळा असे प्रश्न विचारणारे जरा मर्यादाभंग करताहेत असं वाटू शकतं, पण नेते आणि सामान्य नागरिक यांच्यात समपातळी आणण्याची ती एक चाणाक्ष पद्धत असते. नेता कितीही थोर बनला किंवा उच्च पदावर बसला तरी कोणी सोम्या-गोम्या पत्रकार त्याला अडवून प्रश्न विचारू शकतो—तिथे त्या पत्रकाराच्या रूपाने सामान्य नागरिक नेत्याची झाडाझडती घेत असतो.

राजकीय पुढारी जसजसे राजकारणात मुरतात, तसे या झाडझडतीला सरावतात. असं म्हणूयात की ते लोकशाहीच्या या राजकीय समानतेच्या संस्कृतीला शरण जातात. ते रागावतात, चुकतात, पळ काढतात, पण मनोमन लोकशाहीची ही अनवट आणि अवघड रीत अंगी बाणवतात.

मोदी

फोटो स्रोत, Getty Images

मोदी किमान गेली अडीच दशके राजकारणात बर्‍यापैकी वरच्या पातळीवर राहिले आहेत. तरीही त्यांनी लोकशाहीची ही रीत अंगीकारलेली नाही.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांच्या या राजकीय मर्यादेमध्ये नक्कीच एक तुच्छताभाव आहे. पत्रकारांमुळे कुठे मला मते मिळतात, अशी भावना आहे. पत्रकारांनी नकारात्मक लिहिलं तरी लोक माझ्याच मागे आहेत, असाही अंहभाव आहे.

याचं कारण निवडणुका लढवून आणि जिंकून जरी ते राजकीय सत्ता मिळवत आले असले तरी मूलतः राजकीय सत्तेचा हमरस्ता म्हणजे 'लोक' नावाच्या सामूहिक घटितावर विभिन्न मार्गानी कब्जा करून शासकीय सत्ता हाती घ्यायची आणि मग ती वापरून राजकीय सत्ता आणखी वृद्धिंगत करायची हा त्यांचा मार्ग राहिला आहे.

एका परीने मोदींच्या नेतृत्वाची धाटणी वर सांगितलेल्या लोकशाहीच्या संस्कृतीत बसणारी नाही.

संवादाविना पाच वर्षं

पाच वर्षं त्यांनी अशी संवाद न करता काढली. त्याचं एक कारण शासकीय सत्ता, प्रचार यंत्रणा आणि प्रतिमा यांनी त्यांचं संरक्षण केलं, हे जसं आहे तसंच माध्यमांच्या बाबतीत 'कर लो मुठ्ठी में' हा मंत्र त्यांनी जपला. गेल्या सत्तर वर्षांत अगदी आणीबाणीच्या काळातही माध्यमे इतकी चूप नव्हती.

मुद्दलात २०१३ पासून भारतीय माध्यमांचा एक मोठा हिस्सा बेभानपणे एका शहेनशहाच्या कच्छपी लागला. त्यातच पत्रकार-संपादक यांना मालकांकडून घरी बसवलं जाणं हेही या काळात घडत राहिलं.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

एखाद्या पक्षाची मुखपत्रेसुद्धा जेवढी आक्रमकपणे आपल्या पक्षाचे प्रेमाराधन करणार नाहीत इतक्या मोकळेपणे सरकार आणि त्याचे सर्वोच्च नेते यांचा नुसता नामजप नव्हे, नुसते गुणगानही नव्हे तर त्यांच्या वतीने सतत गुरकवून शाब्दिक धाकदपटशा गाजवणारी माध्यमे याच काळात उदयाला आली. त्यामुळे २०१९ पर्यंत सगळं काही छान-छान चाललं.

पण पक्षीय राजकारण आणि निवडणुका यांची गंमत अशी असते की त्यांचा स्वभाव अंतिमतः वर म्हटल्याप्रमाणे राजकीय समानतेकडे झुकणारा आणि सत्ताधार्‍यांची झाडाझडती घेण्याचा असतो.

'रिलॅक्स्ड' राहुलशी तुलना

अखेरीस या स्वभावाने निवडणुकीच्या मोसमात मोदींना गाठले. आणि काव्यगत न्याय म्हणावा तर असा की मोदींची ही कोंडी व्हायला निमित्त झाले ते 'पप्पू' राहुल गांधी.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदा आणि मुलाखती यांच्यामध्ये जे तणावरहित वातावरण असायचं त्यामुळे मोदींना निदान संहितेवर आधारित म्हणजे स्क्रिप्टेड मुलाखती देणं भाग पडलं. त्यातून मग तुलना होणं अपरिहार्य झालं.

राहुल गांधी

फोटो स्रोत, PTI

राहुल गांधी न आवडणारे अजूनही देशात कितीतरी लोक असतील, मोदी आवडणारे खूपच आहेत. पण जेव्हा माध्यमांमधून ते नव्याने लोकांपुढे यायला लागले तेव्हा एकीकडे राहुल गांधींची (पराभव होऊ शकतो अशी शक्यता असतानाही) 'रिलॅक्सड' देहबोली आणि आपण जिंकणारच असं ठामपणे सांगणार्‍या अनुभवी नेत्याचे तणावग्रस्त चेहरे आणि पाठांतर केलेली उत्तरे यांचा लोकांच्या मनावर खोल कुठेतरी परिणाम होणार हे अपरिहार्य आहे.

त्याचा आताच्या निवडणुकीच्या निकलाशी थेट संबंध भलेही नसेल, पण आपली लोकशाही संवाद न करणार्‍या नेत्याला कशी चालवून घेते हा प्रश्न तर या निमित्ताने उभा राहिलाच आहे. देशाच्या पंतप्रधानाला लोकांशी एकतर्फी बोलायलाच फक्त का आवडतं हा एकमेव प्रश्न आताच्या निवडणुकीमधून पुढे आला.

सतत पाच वर्षे बोलत असलेला आपला नेता अचानक 'आंशिक' मौनव्रतात गेल्याचं परवाच्या शुक्रवारी आपण पाहिलं. अवघड प्रश्न सोडवता न येणार्‍या विद्यार्थ्याबद्दल कोणालाही चटकन सहानुभूती वाटू शकते. पण प्रश्नच नको असलेला नेता दिसला तर नागरिक म्हणून आपल्याला काळजीच वाटायला हवी.

(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)